।। श्रीगोपाळनाथ परब्रह्मणेनमः ।।

श्री वासुदेव, परब्रह्म, अनंतकोटी, ब्रम्हांडनायक, सच्चिदानंद, ज्ञानविग्रह, त्रैलोक्याधीश, सर्वोत्तम महापुरुष,
परब्रह्म श्रीगोपाळनाथ महाराज


परब्रह्म श्रीगोपाळनाथ संजीवन समाधी

अपारा, अगम्या, अनामा, अरुपा । कृपाळा अति स्वामिया चित् स्वरुपा ।।

श्रुति शिणल्या वर्णिता गुणगाथा । नमस्कार श्रीब्रह्म गोपाळनाथा ।।

सतराव्या शतकात लोकशिक्षणाचा पुरस्कार करणारी व नाथसंप्रदायाचा अद्वैत मताचा झेंडा उत्तुंग फडकविणारी विभुती श्री गोपाळनाथांच्या रुपाने अवतीर्ण झाली. मराठवाडा ही संतांची भूमी मानली जाते. या पवित्र भुमीत गोपाळनाथांचा जन्म इ.स. १७०० च्या गोकूळ अष्टमीच्या अपूर्व योगावर झाला. याच योगावर योगेश्वर भगवान श्री गोपाळकृष्णांचा जन्म, याच योगावर योगीराज श्री ज्ञानेश्वरांचा जन्म. श्रीनाथांची संजीवन समाधी इ.स. १७६६ ची. ही समाधी त्यांनी त्रिपुटी ता. कोरेगांव जि. सातारा येथे घेतली आहे. इ.स. २०१६ मध्ये त्यांच्या समाधीला २५० वर्ष पूर्ण होत आहेत, तर त्यांच्या जन्माला ३१२ वर्ष झाली.

गोपाळनाथ हे व्यक्तिगत साधनेमधे योगी होते. सर्व योगांगांची त्यांना उत्तम माहीती होती. त्यांचे अपुर्व योगसामर्थ्य त्यांच्या चरित्रात पदोपदी दिसुन येते. परंतु त्यांनी जनसामान्यांना शिकवण देताना मात्र योगमार्गाची दिली नाही. ती अद्वैत शास्त्राची, ब्रह्मज्ञान समजून घेण्याची शिकवण दिली. त्यांनी मनुष्याने जातिधर्माच्या पलिकडे जाऊन सर्वांठायी समभाव बाळगणे, कर्मकांडाचा व हिंसेचा निषेध करुन निव्वळ ज्ञानसंपन्न व चारित्र्यसंपन्न जीवन जगणे म्हणजे मनुष्यजन्माचे सार्थक होय, असा उपदेश केला.

गोपाळनाथांनी मराठवाड्यापासून जीवन यात्रेला प्रारंभ करुन विदर्भ पश्चिम महाराष्ट्रभर संचार केला. त्रिपुटी येथे ते स्थिरावले. तेथेच जिवंत समाधी घेतली. त्रिपुटी परीसराची नाथांनी निवड केली कारण तो परीसर अति प्राचिन काळापासून पवित्र भुमी म्हणुन प्रसिद्ध आहे. आज जेथे नाथ-मठ व समाधी आहे, तेथे पुर्वी सप्तर्षींचा आश्रम होता. ऋषींनी तेथे यज्ञयाग केलेले आहेत. नजिकच स्वयंभू हनुमंताचे स्थान जरंडागिरीवर आहे. म्हणून ही पवित्र भूमी नाथांनी निवडली. शामराजांनी (गोपाळनाथांचे बंधू) ब्रह्मरुपिणी देवीची आरती रचली आहे, त्यात ते त्रिपुटीविषयी म्हणतात -

सच्चिदानंद क्षेत्र । त्रिपुटी हे उत्तम । गोल्हाट औट पीठ । स्वरुपांश उगम ।।

स्वरुप सत्य तुझे । ऋषा जन्म ते स्थान । आनंद सरोवरी । रहिवास आराम ।।

गोपाळनाथ हे विलक्षण व्यक्तिमत्व होते. एक योगी म्हणून ते थोर होते, भाष्यकार होते. ज्यांच्या वाणीने अनेक विद्वान व सामान्य लोकही त्यांचे अनुयायी झाले. ज्यांनी अखिल महाराष्ट्रात संचार करुन सर्वत्र आपली मठ-आसने-केंद्रे साद्वारा आजतागायत चालत आलेली परंपरा निर्माण केली. अनेक साहित्यकारांना प्रेरणा दिली. ते व्यक्तिमत्व असामान्य होते यात काही शंका नाही.